नवी दिल्ली: इंधन दरवाढीमुळे देशातील नागरिक मेटाकुटीला आले असतानाच मिझोराममध्ये एक नवा पेच उद्भवला आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि मिझोराम (Mizoram) या दोन राज्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे आसाम आणि मिझोराममधील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मिझोरामला जाण्यासाठीचा राष्ट्रीय महामार्ग आसाममधून जातो. मात्र, संघर्षामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी इंधनाचे टँकर मिझोराममध्ये पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे मिझोराममध्ये इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मिझोराम सरकारने राज्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक वाहनासाठी इंधनाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना 5 लीटर आणि चारचाकी वाहनांना फक्त 10 लीटर इंधन मिळत आहे. तर सहा, आठ आणि बारा चाकांच्या अवजड वाहनांना एकावेळी 50 लीटर आणि पिकअप ट्रक्सना एकावेळी फक्त 20 लीटर इंधनाची मर्यादा आखून देण्यात आली आहे.
मिझोराम सरकारच्या आदेशानुसार, स्कुटरमध्ये एकावेळी तीन लीटरच पेट्रोल भरता येईल. तसेच अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना राज्यात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी आवश्यक असेल इतक्याच इंधनाचा पुरवठा केला जाईल. तसेच पेट्रोल पंपांवरुन कॅनमध्ये इंधन भरून नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
त्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याचे संकेत ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेकडून देण्यात आले आहेत. तसे घडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होऊन त्याचा थेट फायदा भारताला मिळेल. परिणामी आगामी दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपयांनी खाली येऊ शकतात.
मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45
पुणे: पेट्रोल- 107.39, डिझेल 95.71
नाशिक: पेट्रोल- 108.14, डिझेल 95.85
औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69
कोल्हापूर: पेट्रोल- 107.89, डिझेल 95.97
संबंधित बातम्या:
पेट्रोलसाठी खिसा होणार नाही रिकामा, तगड्या मायलेजसह ‘या’ बाईकवर भन्नाट ऑफर
देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?