मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 तर डिझेलच्या प्रतिलीटर दरात 38 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.09 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 101.78 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.03 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.12 आणि 93.92 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ पीएनजी, सीएनजीच्या किंमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत 2.28 रुपये प्रति किलोने वाढ जाहीर केली. किमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत सीएनजी गॅसची किंमत वाढून 49.76 प्रति किलो होईल. नोएडामध्ये ही किंमत 56.02 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढेल. गुरुग्राममध्ये ही किंमत 58.20 रुपये किलो, रेवाडी 58.90 रुपये किलो, कैथल 57.10 रुपये किलो, मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली 63.28 रुपये किलो, फतेहपूर आणि हमीरपूर 66.54 रुपये किलो आणि अजमेर, पाली, राजसमंद 65.02 रुपये प्रतिकिलो असेल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
इतर बातम्या:
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?