मुंबई: देशात गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे इंधनदरवाढीमुळे धास्तावलेल्या नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी भरभर वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या (Fuel Rates) किंमतींना ब्रेक कसा लागला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी कारणीभूत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे भाव स्थिर असले तरी पुन्हा एकदा हे दर वाढू शकतात. वाढत्या मागणीमुळे अमेरिकेने खनिज तेलाचा दर वाढवला आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील इंधनाच्या दराने वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन सध्या सामान्य नागरिक आणि विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर 12 दिवसांपासून दरात कोणतेही बदल झाले नसल्याने हे इंधन स्वस्त होण्याचे संकेत आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती.
मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45
पुणे: पेट्रोल- 107.56, डिझेल 95.71
नाशिक: पेट्रोल- 107.70, डिझेल 95.85
औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69
कोल्हापूर: पेट्रोल- 107.80, डिझेल 95.97
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
संबंधित बातम्या:
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…
आता कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार होणार बायोडिझेल, एका लीटरमध्ये 38 किलोमीटर मायलेज
पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर