नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवे उच्चांक गाठणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसला आहे. कारण, सलग 30 व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पेट्रोल-डिझेलची यापूर्वीची धडकी भरवणारी वेगवान दरवाढ पाहता महिनाभर किंमती स्थिर राहणे, हादेखील एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. गेल्या महिनाभरात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे.
यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील दरात एका पैशाचीही वाढ केलेली नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले. मात्र, एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 32 रुपयांनी वाढ झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे बोट दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. तसेच राज्यांकडून पेट्रोल आणि डिझेलवर कर लादला जातो. त्यामुळे इंधनाच्या दरात इतकी वाढ झाल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री सिंग पुरी यांनी सांगितले होते.
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.
संबंधित बातम्या:
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?