मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत असतानाच आता एक दिलादायक गोष्ट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बऱ्याच दिवसांनी खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. अमेरिका आणि इराणकडून खनिज तेल उत्पादनावरील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचा पुरवठा सुरळीत होऊन खनिज तेलाचे दर आगामी काळात आणखी घसरतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
ही बाब खनिज तेलाच्या बाजारपेठेसाठी नकारात्मक असली तर भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांच्यादृष्टीने सकारात्मक मानली जात आहे. यामुळे भारतात शंभरीपार गेलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील, असा अंदाज आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना याचा फायदा देणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 35 आणि 36 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 105.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 108.64 आणि 97.38 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला होता. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 86 डॉलर्सवर पोहोचली होती. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत क्रूड ऑईलच्या किंमतीमध्ये घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
संबंधित बातम्या:
तर तुम्हालाही आताच बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं उरकावी लागणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा ‘हा’ म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!