नवी दिल्ली: पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY अंतर्गत, गरिबांना नोव्हेंबर नंतर मोफत रेशन मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाकाळातील देशव्यापी लॉकडाऊनवेळी ही योजना देशातील गरीबांसाठी मोठा आधार ठरली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये या योजनेचा कालावधी संपुष्टात येत असून त्यानंतर मोदी सरकार योजनेला मुदतवाढ देण्याच्या विचारात नसल्याचे समजते.
केंद्र सरकारचे अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत मोफत रेशनचे वितरण नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने आणि आमची OMSS (ओपन मार्केट सेल स्कीम) देखील यावर्षी चांगली राहिली आहे. त्यामुळेच मोफत रेशन देण्याच्या योजनेच्या मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे केंद्र सरकार ही योजना बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या वर्षभरापासून या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर योजनेला 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
देशातील 80 कोटी नागरिकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य मिळत होते. यामध्ये प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 1 किलो हरभरा डाळ मोफत दिली जात होती. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच पट जनतेला आपल्या सरकारकडून मोफत अन्नधान्य दिल्याचं मोदींनी सांगितले होते.
इतर बातम्या:
केंद्राने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी केली, ठाकरे सरकार करणार का? शरद पवारांनी 5 शब्दात निकाल लावला!
…म्हणून भाजपला इंधानाचे दर कमी करावे लागले- पी चिदंबरम
केंद्राने इंधनाचे दर कमी केले; आता राज्य सरकारही दर कमी करणार की जनतेचा रोष पत्करणार?
VIDEO: पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय?; राऊतांचा सवाल