नवी दिल्ली : जर तुम्ही टपाल खात्याच्या (Post Office) अल्पबचत योजनांचे (Small Saving Account) खातेदार असाल तर तुमच्यासाठी आणखी एक सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार, आता घरबसल्या तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती ऑनलाईन (Online Facility) प्राप्त करता येणार आहे. तेवढ्यासाठी तुम्हाला पोस्टाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही.
पोस्ट ऑफिसने स्मॉल सेविंग स्कीम्सच्या अकाउंट होल्डर्ससाठी ई-पासबुक ही सुविधा सुरु केली आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी असा तुम्हाला खात्याची माहिती घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता प्रत्येकवेळी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
खात्यासंबंधीची माहिती घेण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग अथवा मोबाईल बॅकिंग करण्याची गरज भासणार नाही. खातेधारकाला ई-पासबुक सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाचा वापर करता येईल.
विशेष म्हणजे या सुविधेसाठी अल्पबचत योजनांच्या खातेधारकांना कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. ही सुविधा त्यांना मोफत देण्यात येईल. याविषयीची अधिसूचना 12 ऑक्टोबर, 2022 रोजी काढण्यात आली आहे. त्याआधारे तुम्हाला अगदी सहज तुमच्या खात्याची माहिती घेता येईल.
E-Passbook सुविधेमुळे तुम्हाला खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी पोस्ट खात्यात जाण्याची गरज उरली नाही. तुम्ही कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून तुमच्या खात्याशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकता.
ही सुविधा सुरु करण्यासाठी तुम्हाला http://www.indiapost.gov.in अथवा http://www.ippbonline.com या संकेतस्थळावर जावे लागेल. तुम्हाला https://posbseva.ippbonline.com/indiapost/signin या सेवेद्वारेही ई-पासबुकसाठी नोंदणी करता येईल.
पीपीएफ, बचत खातेधारक, सुकन्या समृद्धी खातेदार आणि अन्य अल्पबचत योजनांच्या खातेधारकांना ई-पासबुकचा लाभ घेता येईल. रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी आल्यानंतर तुम्हाला https://posbseva.ippbonline.com/indiapost/signin मध्ये ई-पासबुक हा पर्याय निवडता येईल.