नवी दिल्ली : पंजाब नॕशनल बँकेने (PNB) विविध सेवा शुल्कात बदल केले आहेत. सर्वसाधारण बँकिंग व्यवहारासाठी नव्याने सुधारीत दर लागू करण्यात आलेले आहेत. नवीन बदल 15 जानेवारी 2022 पासून अंमलात आणले जातील. पीएनबीने नवीन बदलांबाबतचे पत्रक नुकतेच जाहीर केले आहे.
किमान बॕलन्स आवश्यकता आणि खात्यात किमान बॕलन्स मर्यादेचे उल्लांघन केल्यास दंडाचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. ग्रामीण भागासाठी अशाप्रकारच्या शुल्कांत 5,000 रुपयांपासून 10,000 हजारांत वाढ करण्यात आली आहे.
खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत खाते बंद केल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्क संरचनेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी 800 रुपये शुल्क आकारले जात होते. नवीन संरचनेनुसार 600 रुपयांची आकारणी केली जाईल. 12 महिन्यानंतर खाते बंद केल्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
डिमांड ड्राफ्ट/अन्य साधने वैधता, रद्दीकरण शुल्क, गहाळ कागदपत्रे जारी करणे, ड्युप्लिकेट ड्राफ्ट जारी करण्याच्या शुल्कांत फेररचना करण्यात आली आहे. नवी दरानुसार 100 रुपयांऐवजी 150 रुपये आकारले जातील.
लॉकर/ सुरक्षित कस्टडी साठी वार्षिक भाडे शुल्कात ग्रामीण तसेच शहरी,मेट्रोसाठी वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागाची लोकसंख्येनुसार वर्गवारी करण्यात आली आहे. बँकेच्या वेबसाईटवर ग्राहकांना दर संरचनेची विस्तृत माहिती वाचायला मिळेल
नवीन बदलानुसार कार्यवाहीच्या संख्येवर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी प्रति वर्षाला 15 वेळा लॉकर भेटी मोफत होत्या. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीसाठी 100 याप्रमाणे शुल्क आकारणी केली जात होती. नवीन बदलानुसार वर्षाला 12 लॉकर भेटी मोफत करण्यात आल्या आहेत आणि त्यांनतर प्रत्येक भेटीसाठी 100 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.
पीएनबीने वरील सेवांव्यतिरिक्त बँकेच्या वेबसाईटवर नमूद अन्य बँकिंग संबंधित सर्वसाधारण सेवांत कोणतेही बदल नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच माहितीपत्रकात नमूद केलेले सर्व सेवा शुल्कांवर कोणत्याही प्रकारचे कर नाही (उदा. GST) कर समाविष्ट असल्यास नमूद केले जाईल. त्यानुसार यापूर्वी लागू असलेले कर अतिरिक्त पणे आकारले जातील”
इतर बातम्या
Gold Rate| सोन्याचे मायाजाल; जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचे दर…
आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व शुल्कांमध्ये वाढ, नवे दर दहा फेब्रुवारीपासून लागू