नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नवनव्या उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. देशातील अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट झाला असून याठिकाणी आता जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतात. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुविधांच्याबाबतीत एअरपोर्टशी स्पर्धा करणाऱ्या गांधीनगर रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले होते.
पुनर्विकास परियोजनेतंर्गत देशातील 123 रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलचा अवलंब करण्यात आला. यानंतर आता पूर्वमध्य मार्गावरील राजेंद्र नगर टर्मिनल, मुजफ्फुरपूर, बेगुसराय आणि सिंगरौली या पाच स्थानकांचा विकास केला जात आहे.
पुनर्विकास परियोजनेतंर्गत सीतामढी, दरभंगा, बरौनी, धनबाद आणि पंडित दीनदयाल उपाध्याय या रेल्वे स्थानकांचाही विकास केला जाईल. सीतामढी आणि दरभंगा ही बिहारच्या मिथीला परिसरातील बडी शहरे आहेत. धार्मिक कारणांमुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. या सगळ्या स्थानकांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.
या सर्व रेल्वे स्थानकांवर विमानतळाप्रमाणे जागतिक दर्जाच्या सुविधा उभारल्या जातील. प्रवाशांना सुरक्षा, प्रवासाचा चांगला अनुभव आणि उत्तम सुविधा देणे हे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे. रेल्वे स्थानकाची इमारतही अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज आणि पर्यावरणपूरक असेल. याठिकाणी सौरउर्जा उपकरणे आणि इतर सुरक्षा उपकरणे असतील.
रेल्वे स्थानकांच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटसवर प्रवाशांची नेहमी गर्दी होते. त्यासाठी या पाच स्थानकांवर एक्सेस कंट्रोल गेट, सरकते जिने लावले जातील. तसेच स्थानकांवर प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, एटीएम आणि इंटरनेट यासारख्या सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातील.
संबंधित बातम्या:
भारतीय रेल्वेला अच्छे दिन, मे महिन्यात ‘या’ कारणामुळे कोट्यवधींची कमाई
रेल्वेचा झिरो बेस्ड टाईमटेबल काय आहे? प्रवाशांवर काय परिणाम होणार ?