भारतीय रेल्वेने रोज देशातील कोट्यवधी जण प्रवास करतात. परंतु रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवणे मोठे अवघड काम असते. दोन, तीन महिन्यांपूर्वी नियोजन करुन तिकीट केल्यास आरक्षित तिकीट सहज मिळते. परंतु सुट्या अन् ऐनवेळेस ठरलेल्या कार्यक्रमांच्या वेळी रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळत नाही, असा अनुभव अनेकांना आहे. मग त्यासाठी तत्काल तिकीट बुकींगचा पर्याय निवडला जातो. परंतु तत्काल तिकीट एक, दोन मिनिटांत संपतात. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडते. परंतु तत्काल तिकीटानंतर एक पर्याय असतो. हा पर्याय अनेकांना माहीत नाही. या पर्यायाचा वापर केल्यास कन्फर्म तिकीट मिळू शकतो. हा पर्याय करंट तिकिटाचा आहे.
रेल्वेने प्रवास करणारे काही जण आपले तिकीट ऐनवेळेस रद्द करतात. त्यावेळेस रेल्वेचे ते सीट रिकामे राहते. मग रेल्वेने करंट तिकीट म्हणून सुविधा सुरु केली. ही सुविधा रेल्वेचे चार्ट बनल्यानंतर मिळते. हे तिकीट रेल्वे सुटण्याच्या चार तासांपूर्वी अगदी ट्रेन सुटल्याच्या पाच मिनिटापर्यंत मिळू शकते.
तत्काल तिकिटासाठी जास्त पैसे लागतात. परंतु करंट तिकीटासाठी जास्त पैसे लागणार नाही. आरक्षित तिकीटाची जी रक्कम आहे, तिच रक्कम लागणार आहे. कोणत्याही रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर आयआरसीटीसी अॅप, आयआरसीटीसी वेबसाईट किंवा रेल्वे स्थानकावर जाऊन करंट बुकींग करता येते. त्यासाठी चार्ट लागल्यानंतर ज्या जागा रिकाम्या आहेत, त्या ठिकाणासाठी हे तिकीट कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता मिळते.
रेल्वेने प्रवास करण्यासाठी हा फंडा वापरल्यास कन्फर्म तिकीट मिळते. त्यामुळे तुमच्याकडे रेल्वेचे आरक्षित तिकीट नसले आणि प्रवास करायचा असेल तर हा शेवटचा पर्याय आहे. आता आरक्षित डब्यातून वेटींग तिकीट असल्यावर प्रवास करता येत नाही. त्यामुळे या पद्धतीने आरक्षित तिकीट घेऊन प्रवास करणेच सर्वाधिक योग्य आहे.