मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 1,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत लादलेले निर्बंध 12 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाजाचे तास बंद झाल्यानंतर सहा महिने लागू राहतील. यादरम्यान निर्बंधांचा आढावा घेतला जाईल.
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, लक्ष्मी सहकारी बँक मध्यवर्ती बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. तसेच, बँक कोणतीही गुंतवणूक करणार नाही किंवा कोणतेही पैसे देणार नाही किंवा पेमेंट करण्यास संमती देणार नाही. विशेषतः सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ज्या ग्राहकांच्या खात्यातून कर्जाचा हप्ता कापला जातो, त्यांना अटींनुसार तो सेटल करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. बँकेवर निर्बंध लादले म्हणजे बँकिंग परवाना रद्द झाला असे मानू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील.
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवरही कारवाई केली होती. त्यामुळे ग्राहकांना बँकेतून फक्त 5000 रुपयांचीच रक्कम काढता येणार आहे. यवतमाळची ही सहकारी बँक आता रिझव्र्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही पेमेंट किंवा कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकत नाही. याशिवाय, रिझव्र्ह बँकेच्या मान्यतेशिवाय, बँक कोणतेही पेमेंट करू शकणार नाही, कोणत्याही व्यवस्थेत सहभागी होणार नाही किंवा ती तिची मालमत्ता विकू किंवा हस्तांतरित करू शकणार नाही. सर्व बचत बँक किंवा चालू खाते किंवा इतर खातेदारांना बँकेची सध्याची रोख स्थिती पाहता त्यांच्या खात्यातून 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
संंबंधित बातम्या:
आरबीआय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, काय आहे विशेष? कोणत्या बॅंकांवर परिणाम होईल?
जास्त जनधन बँक खाती असलेल्या राज्यांतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट: एसबीआय
‘या’ बँकेत तुमचं खातं आहे का, नाशिकमधील सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई