Rule Change From 1st December : डिसेंबरमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. या आर्थिक बदलांचा थेट परिणाम प्रत्येक घरावर आणि प्रत्येक खिशावर दिसून येतो. नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेसह देशात लागू करण्यात आलेले हे मोठे बदल पाहिले तर सर्वात मोठा धक्का LPG च्या ग्राहकांना बसेल.
पुन्हा एकदा व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे, ही दुरुस्ती 1 डिसेंबर 2024 पासून लागू झाली आहे. याशिवाय देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल पाहायला मिळणार आहेत.
LPG सिलिंडरचे दर
या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच 1 डिसेंबर 2024 पासून अनेक नियम बदलतात आणि विशेषत: एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत होणाऱ्या दुरुस्तीवर सर्वांचे लक्ष असते. नोव्हेंबरमध्ये दरवाढीनंतर तेल विपणन कंपन्यांनी डिसेंबरच्या पहिल्या तारखेला पुन्हा एकदा 19 किलोगॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत हा LPG सिलिंडर 1818.50 रुपये झाला आहे, जो आतापर्यंत 1802 रुपये मिळत होता.
मुंबई LPG सिलिंडरची किंमत पाहिली तर 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1754.50 रुपये होती, जी आता 1771 रुपये झाली आहे.
हवाई इंधनाच्या दरात बदल
LPG सिलिंडरच्या किमतींबरोबरच एअर टर्बाइन इंधनाच्या (ATF) किमतीतही तेल वितरण कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारणा केली जाते. यंदा 1 डिसेंबर रोजी हवाई इंधनाच्या दरात बदल करण्यात आला असून त्यात वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच विमान प्रवास महागात पडू शकतो. ATF च्या किमतीतही सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे.
1 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ATF चा दर 3.3 टक्क्यांनी वाढून 90,538.72 रुपये प्रति किलोलीटर झाला होता, जो 1 डिसेंबर रोजी 91,856.84 रुपये प्रति किलोलीटर झाला. मुंबईत तो 84,642.91 रुपयांवरून 85,861.02 रुपये, कोलकात्यात 93,392.79 रुपयांवरून 94,551.63 रुपये आणि चेन्नईमध्ये 93,957.10 रुपयांवरून 95,231.49 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.
SBI क्रेडिट कार्ड
तिसरा मोठा बदल क्रेडिट कार्डचा आहे. हे बदल SBI क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्त्वाचे आहे. SBI कार्डच्या वेबसाइटनुसार, पहिल्या तारखेपासून 48 क्रेडिट कार्डमधील डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/ व्यापाऱ्यांशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. जे आजपासून लागू होऊ शकते.
17 दिवस बँकांना सुट्टी
RBI च्या बँक हॉलिडे लिस्टवर नजर टाकली तर या बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमधील विविध सण आणि कार्यक्रमांच्या आधारे निश्चित करण्यात आल्या आहेत आणि यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही ही बँक सुट्टीची यादी पाहू शकता.
क्रेडिट कार्ड शुल्कात बदल
डिसेंबरमध्ये आधार कार्ड फ्री अपडेटवरून अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डमध्ये बदल होणार आहे. UIDAI कडून मोफत आधार अपडेटची मुदत 14 डिसेंबर रोजी संपत आहे, याशिवाय अॅक्सिस बँक या महिन्याच्या 20 डिसेंबरपासून आपल्या क्रेडिट कार्ड शुल्कात बदल करणार आहे. यावरील आर्थिक शुल्क दरमहा 3.6 टक्क्यांवरून 3.75 टक्के करण्यात येणार आहे.