नवी दिल्ली : सामान्य लोकांकडून अनेकदा असा दावा केला जातो की, भारत (India) जेव्हा स्वतंत्र (Independent) झाला म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला तेव्हा एक रुपयाचे मूल्य एक डॉलर (Dollars) एवढे होते. मात्र खरच जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा एक रुपयाचे मूल्य एक डॉलर एवढे होते का? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत रुपयामध्ये किती घसरण झाली? हे आज आपण जाणून घेणार आहोत. रुपया आणि डॉलरबाबत जाणून घेण्यासारखी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी रुपयाच्या मूल्याचे मोजमाप हे ब्रिटनचं चलन असलेल्या पाउंडच्या तुलनेत करण्यात येत होते. तेव्हा भारतीय रुपयाचे मूल्य प्रति पाउंड 13.37 रुपये एवढे होते. त्या काळात पाउंड आणि डॉलरची तुलना केल्यास 15 ऑगस्ट 1947 रोजी डॉलरच्या तुलनेत एका रुपयाचे मूल्य हे प्रति डॉलर 4.16 रुपये एवढे होते. मात्र त्यानंतर सातत्याने रुपयाच्या मूल्यात घसरण होत गेली.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर रुपयांच्या मूल्यामध्ये मोठा बदल झाला. 1966 साली भारताला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला होता. या आर्थिक मंदीचा मोठा फटका हा रुपयाला बसला. रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली. रुपया प्रति डॉलर 7.5 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. त्यानंतर 1991 साली भारताने आर्थिक सुधारणेसाठी उदारीकरणाचे धोरण स्विकारले. मात्र या काळात भारत मोठ्या आर्थिक संकटातून जात होता. या वर्षी भारताजावळ विदेशातून वस्तू आयात करण्यासाठी देखील पुरेशा प्रमाणात परकीय चलनाचा साठा नव्हता. याचा फटका हा रुपयाला बसला आणि रुपया प्रति डॉलर 25 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला. भारतात उदारीकरण लागू झाल्यानंतर रुपयाचे मूल्य हे मार्केट आधारीत बनले. त्यामुळे रुपया आणखी घसरला आणि प्रति डॉलर 35 च्या पातळीवर पोहोचला.
वर्ष 2013 मध्ये रुपयाच्या मूल्यात अचानक मोठी घसरण झाली. त्यामागे कारण होते ते म्हणजे आयातीसाठी वाढलेली डॉलरची मागणी. काही दिवसांमध्येच रुपयांचे मूल्य हे प्रति डॉलर 55.48 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. त्यानंतर आली नोटबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानुसार हजार आणि पचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली. नोटबंदीमुळे रुपयाचे मूल्य आणखी घसरले. रुपयाचे मूल्य प्रति डॉलर 67 च्या पातळीवरून प्रति डॉलर 71 रुपयांवर पोहोचले. तेव्हापासून सातत्याने रुपयामध्ये घसरण सुरूच असून, आता रुपयाचे मूल्य हे प्रति डॉलर 78 रुपयांच्या पातळीवर घसरले आहे.