नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर सूट देण्यात येत होती. मात्र कोरोना काळात तिकीटावर देण्यात येणारी सूट बंद करण्यात आली. भारतात आता कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) कमी झाला आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सूट देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. तिकीटावर सध्या तरी कोणतीही सूट देण्यात येणार नसल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnaw) लोकसभेत बोलताना सांगितले आहे. सध्या तरी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीटात कोणतही सूट मिळणार नसल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. आता त्यांना प्रवासासाठी पूर्ण भाडे भरावे लागणार आहे. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिकांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये मिळणारी सूट देण्यात आलेली नाही. मात्र तीन प्रकारच्या प्रवाशांना तिकीटामध्ये सुट देण्यात आली आहे. यामध्ये दिव्यांग, गंभीर आजार असलेले रुग्ण, आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्येष्ठांना पु्न्हा तिकीट सवलत लागू करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहितीही यावेळी वैष्णव यांनी लोकसभेत दिली.
पुढे बोलताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, जगासह देशावर गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होती. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे विभागाच्या वतीने स्पेशल गाड्यांची व्यवस्था करण्यात आली, मात्र प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने या काळात रेल्वेच्या उत्पन्नावर प्रचंड परिणाम झाला आहे. अशा काळात जर ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा तिकीटात सवलत देण्याचा निर्णय घेतल्यास रेल्वेला मोठा फटका बसू शकतो.
यूएस फेडरल रिझर्व्हकडून अखेर व्याज दरात वाढ; महागाई नियंत्रणासाठी पाऊल