बंगळूरू : कोणत्याही सरकारी कार्यालयाचे कामकाज सायंकाळी संपते. त्यामुळे नागरीकांना सायंकाळी पाचनंतर कोणतीही सरकारी कार्यालयाची सेवा मिळत नाही. त्यात जर रात्री उशीरापर्यंत सेवा देणाऱ्या पोस्ट कार्यालयाची सोय असेल तर किती मजा येईल ना ! हो हे खरे आहे, आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात देशातील पहिले सायंकालीन पोस्ट ऑफीस सुरू करण्यात आले आहे. काय आहे ही योजना, हे पोस्ट कार्यालय कोणत्या सेवा देणार आहे. याची माहिती जाणूया …
बंगळूरु शहरात सोमवारी देशातील पहील्या सायंकालीन पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन केले गेले. या पोस्ट कार्यालयात स्पीड पोस्ट ते आधार सुविधा केंद्राची सुविधा मिळणार आहे. हे अनोखे कार्यालय आठवड्यातून सहा दिवस दुपारी एक ते रात्री ९ वाजेपर्यंत सेवा देणार आहे. या पोस्ट कार्यालयात नागरिकांना स्पीड पोस्ट, पार्सल बुकींग, पार्सल पॅकींग, आधार केंद्र सेवा, पिक्चर पोस्ट कार्ड आणि स्टँप आदी सेवा मिळणार आहेत.
ही सायंकालीन पोस्ट कार्यालयाची संकल्पना नोकरीमुळे आपली पोस्टविषयक कामे करता न येणाऱ्यांसाठी अस्तित्वात आली आहे. सर्व सामान्य पोस्ट कार्यालयाची काऊंटर दुपारी साडे तीनलाच बंद होत असतात. परंतू सायंकालीन पोस्ट कार्यालय ही अत्यंत आर्कषक संकल्पना असून ती कामकाज करणाऱ्या नोकरपेशा व्यक्तींसाठी तसेच ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे पोस्टल असिस्टंट विनय श्रेयस यांनी सांगितले.
नोकरी पेशा वर्गासाठी अधिकाधिक सायंकालीन पोस्ट कार्यालये उघडण्याची योजना असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. कर्नाटकात धारवाड येथे आधी गेल्यावर्षी नोव्हेंबरात अशा उपक्रमास यश आल्याने हा प्रयोग बंगळूरात राबविण्यात आला आहे. तीन लाख रूपयांत या कार्यालयाचे सुशोभिकरण केले असून पोस्ट कार्यालयाच्या इतिहास ही थीम वापरून या पोस्ट कार्यलयाची निर्मिती केली आहे.