नवी दिल्ली : मोबाईलवर कॉल (Call) करुन फसवणुकीच्या घटना आता सामान्या झाल्या आहेत. नेटफ्लिक्सची सीरीज जामताराने (Jamtara) फसवणूक कशी करण्यात येते, याची चुणूक दाखवली. पण आता प्रत्यके शहरात, गावात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येतातच. खासकरुन ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) या जाळ्यात ओढण्यात येते. कॉल कोण करत आहे, याची माहिती नसल्याने बऱ्याचदा फसवणूक होते. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात येते.
आता सर्वसामान्य नागरिकांची आता या फसवणुकीपासून लवकरच सूटका होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) यासाठी कंबर कसली आहे. ट्रायने मोबाईल क्रमांकासोबत नावाचा कॉलर आयडी आणण्याची व्यवस्था केली आहे.
यामुळे तुम्हाला समोरुन नवीन मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला तर, मोबाईल क्रमांकासोबतच त्या व्यक्तीचे नावही दिसेल. वारंवार त्रास देणाऱ्या आणि कंपन्यांच्या कॉलची माहिती ग्राहकांना मिळेल. त्यामुळे हे कॉल उचलण्यात येणार नाही. अथवा त्यांची माहिती समोर येईल.
नाव जाहीर करण्याच्या या व्यवस्थेसंदर्भात ट्रायने नागरिकांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत. ट्रायने मंगळवारी याविषयीची माहिती दिली. नेटवर्कमध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दर्शविणारी व्यवस्था (CNAP) लागू करण्यासंबंधी ट्रायने एक पत्र जारी केले आहे.
त्यानुसार, संबंधितांकडून या नवीन व्यवस्थेविषयी 27 डिसेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. या सूचनांवर, हरकतींवर 10 जानेवारी 2023 रोजी पर्यंत उत्तर देण्यात येणार आहे. त्यानंतर हा व्यवस्थेविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
भारतात आतापर्यंत ट्रुकॉलर आणि इतर मोबाईल अॅपच्या मदतीने मोबाईल वापरकर्त्यांना कॉल करणाऱ्यांची ओळख पटविता येत होती. पण या अॅपवरील माहिती पूर्णपणे विश्वसनीय स्त्रोत नसल्याने एक उणीव भासत होती. त्यासाठी केंद्र सरकार व्यवस्था करणार आहे.
ट्रायच्या माहितीनुसार, ही व्यवस्था केवायसीवर आधारीत असेल. नवीन सिम कार्ड खरेदी करताना टेलिकॉम कंपन्यांना आधार कार्ड अथवा पॅन कार्डचे सत्यापन करणे आवश्यक असते. नवीन व्यवस्थेत नवीन मोबाईल क्रमांकासोबतच्या कॉलर आयडीला आधारचा तपशील जोडण्यात येणार आहे.