नवी दिल्ली: येत्या काळात देशात खासगी ट्रेन सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गेल्यावर्षी केंद्राकडून राबवण्यात आलेली निवीदा प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे फार पुढे सरकली नव्हती. त्यामुळे आता सरकारकडून ही निवीदा प्रक्रिया नव्याने राबवण्यात येणार आहे. खासगी ट्रेनबाबत बोलायचे झाले तर देशात सध्या दोन मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स चालवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला आगामी काळात देशभरात 75 वंदे भारत ट्रेन्स सुरु करण्याची घोषणा केली होती.
या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. या घोषणेनंतर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये अनेक नव्या सुविधा देण्यात येणार आहेत. सध्या दिल्ली ते वाराणसी आणि नवी दिल्ली ते कटरा या दोन मार्गांवरच वंदे भारत ट्रेन धावते. मात्र, आता देशातील 75 मार्गांवर ही ट्रेन धावणार असल्याने या ट्रेन्समध्ये अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत.
वंदे भारत ट्रेनमध्ये आगामी काळात सेंट्रल कोच मॉनिटरिंग सिस्टीम असेल. सध्या या ट्रेन्समध्ये ऑनबोर्ड इन्फोटेन्मेंटची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, ट्रेनमध्ये जीपीएस आधारित सूचना प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित दरवाज्यांचा समावेश आहे.
आता वंदे भारत ट्रेनमध्ये रिक्लायनिंग सीटमध्ये पुशबॅकची सोय असेल. ट्रेनमधील प्रत्येक वातानुकूलित यंत्रणा बॅक्टेरियामुक्त केली जाईल. वंदे भारत ट्रेन्समध्ये सेंट्रल कोच मॉनिटरिंग सिस्टम असेल. आपातकालीन प्रसंगात बाहेर पडण्यासाठी चार इमर्जन्सी खिडक्या असतील. पुरापासून बचाव करण्यासाठी ट्रेनचा खालचा भाग वॉटर रेझिस्टंट असेल.
* वंदे भारत ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये चार डिझास्टर लाईट लावण्यात येतील. आपाकालीन प्रसंगात या लाईटस सुरु होतील. वीज गेल्यास तीन तास ट्रेनमध्ये व्हेंटिलेशन सुविधा सुरु राहील.
* प्रत्येक कोचमध्ये दोन इमर्जन्सी बटणे असतील. दरवाजांच्या सर्किटमध्ये अग्निरोधक केबल्सचा वापर केला जाईल.
* वंदे भारत ट्रेन 2018 साली तयार करण्यात आल्याने या गाडीला ट्रेन-18 असेही म्हटले जाते. या गाडीतील सर्व डब्यांमध्ये वातानुकुलन यंत्रणा आहे. या गाडीतील सीट, लगेज रॅक, शौचालये आधुनिक पद्धतीची आहेत
* प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉईंटची सोय आहे. जीपीएसवर आधारित पॅसेंजर इन्फोर्मेशन स्क्रीन आणि दिव्यांगांसाठी विशेष टॉयलेटसची सोयही या ट्रेनमध्ये आहे.
* ही ट्रेन प्रतितास 180 किलोमीटर वेगाने प्रवास करते. 2021 च्या सुरुवातीला भारतीय रेल्वेने 44 वंदे भारत ट्रेन्समध्ये प्रोपेल्शन सिस्टीम, कंट्रोल आणि इतर उपकरणे लावण्यासाठी मेधा सर्वो ड्राईव्हसला कंत्राट दिले होते.
संबंधित बातम्या:
वेगवान भारतासाठी पंतप्रधान मोदींची 100 लाख कोटींची योजना, जाणून घ्या काय फायदा होणार?