भारतीय रेल्वेने रोज लाखो जण प्रवास करतात. त्यातील अनेक जण आरक्षण करुनच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. आरक्षण केलेल्या कन्फर्म तिकीटाचे अनेक फायदे आहेत. प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना या फायद्यांची माहिती नसते. रेल्वे प्रवास करताना तिकिटासोबत मिळणाऱ्या या फायद्याची तुम्हाला माहिती असायला हवी. या प्रवाशांना कमी किंमतीत राहण्याची सुविधा मिळते. आपले सामान अल्प किंमतीत क्लॉक रुममध्ये ठेवता येते. वैद्यकीय सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध असते. एसी आणि नॉन एसी वेटींग रुममध्ये थांबण्याची सुविधा कन्फर्म तिकीटधारकांना मिळते.
जर तुमच्याकडे कन्फर्म ट्रेन तिकीट असेल आणि तुम्हाला राहण्यासाठी हॉटेलची गरज असेल, तर तुम्ही IRCTC च्या वसतीगृहाचा वापर करू शकता. जिथे तुम्हाला अगदी स्वस्तात म्हणजेच 150 रुपयांपर्यंत बेड मिळेल. हे फक्त 24 तासांसाठी वैध आहेत.
भारतीय रेल्वेमध्ये, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट सर्व AC 1, 2 आणि 3 मध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. गरीब रथमध्येही या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत. जर तुम्हाला एसीमध्ये या गोष्टी मिळत नसतील तर तुम्ही तुमचे ट्रेनचे तिकीट दाखवून या गोष्टी मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा तुम्हाला कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन मदत हवी असेल तर ट्रेनमध्येच ती सुविधा आहे. तुम्हाला फक्त ट्रेनची माहिती आरपीएफ जवानाला द्यावी लागेल. तसेच यासाठी तुम्ही रेल्वेचा क्रमांक 139 वर कॉल करू शकता. तुम्हाला तत्काळ प्रथमोपचाराची सुविधा मिळेल. जर ट्रेनमध्ये तुम्हाला हवी असलेली सुविधा नसेल तर पुढील स्टेशनवर ती व्यवस्था रेल्वेकडून केली जाते.
जर तुम्ही राजधानी, दुरांतो किंवा शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये तिकीट बुक केले असेल आणि ही ट्रेन 2 तासांपेक्षा जास्त उशीराने असेल, तर तुम्हाला IRCTC कॅन्टीनमधून मोफत जेवण देखील दिले जाईल. जर तुम्हाला जेवण दिले जात नसेल तर तुम्ही 139 नंबर डायल करून तक्रार करू शकता.
सर्व रेल्वे स्थानकांवर लॉकर रूम आणि क्लॉक रूमची सुविधा आहे. तुम्ही तुमचे सामान लॉकर रूम आणि क्लॉक रूममध्ये जवळपास 1 महिना ठेवू शकता. तथापि, यासाठी तुम्हाला विशिष्ट शुल्क द्यावे लागेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेल्वेचे आरक्षित तिकीट असणे आवश्यक आहे.
रेल्वेत उतरल्यानंतर किंवा रेल्वे येण्यापूर्वी तुम्ही एसी, नॉन एसी वेटींग रुममध्ये जाऊन तुम्ही आराम करु शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे तिकीट दाखवावे लागणार आहे. वेटींग रुममध्ये थांबण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
तुमच्याकडे आरक्षित तिकीट आहे आणि यापैकी तुम्हाला एखादी सुविधा मिळत नाही तर तुम्ही तक्रार करु शकतात. रेल्वेच्या 139 क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तुम्हाला लागलीच मदत मिळणार आहे.
हे ही वाचा…
जनरल तिकीटावर स्लीपर क्लासमधून प्रवास करता येतो का? काय आहे रेल्वेचा नियम