सरत्या वर्षात करोना महामारी च्या काळात अनेक उद्योगांना फटका बसला. मात्र त्याला आर्थिक क्षेत्र अपवाद ठरले, शेअर बाजार ने तर त्यात उलट्या प्रवाहाच्या दिशेने पोहोण्याची कमाल केली. गेल्यावर्षी शेअर मार्केटने गुंतवणूकदारांना मालामाल केले. ज्या कंपन्या कामगिरी करू शकणार नाहीत, असे वाटत होते त्यांनीही बक्कळ कमाई करून दिली. सेन्सेक्स च्या आकड्यांच्या खेळीने तज्ज्ञांचे अंदाज पार धुडकावले. विक्रीचा आवेग आणि बाजारातील तरलता (Liquidity) यामुळे 2021 मध्ये तेजीचा आलेख पाहायला मिळाला. परंतु यंदा शेअर मार्केटमध्ये एवढी तेजी बघायला मिळणार नाही असा अंदाज शेअर मार्केटमधील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ञांनी गुंतवणूकदारांना संबंधित सेक्टर आणि शेअर याचा अभ्यास करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
2021 मध्ये गुंतवणूकदार झिंगालाला
2021 मध्ये एकीकडे कोरोना महामारीचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये मात्र तेजीचे सत्र सुरू होते. फेब्रुवारी तील अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटने आचानक जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर शेअर मार्केटचा आलेख चढताच राहिला. 2021 मध्ये सेन्सेक्सने 62 हजार अंकाची कमाई करत कामगिरी बजावली. एवढेच नाही तर स्मॉल स्टॉक मधील गुंतवणूकदारांनी ही कमाईत मुसंडी मारली. 2021 मध्ये सेन्सेक्सने तब्बल 10,502 अंकांची चढाई केली. म्हणजेच मार्केट तब्बल 22 टक्क्यांनी वधारले. तर मिडकॅप इंडेक्स 7028 अंकांची वाढ नोंदवत 39 टक्क्यांनी वधारला. सर्वात जोरदार कामगिरी बजावली ती स्मॉल्कॅप इंडेक्सने . स्मॉल्कॅप इंडेक्स 11359 अंकाने वाढला. याचा सरळ सरळ अर्थ स्मॉल्कॅप इंडेक्सने 63 टक्क्यांचा परतावा दिला. वर्षभरात सेन्सेक्सने 62245, मिडकॅप इंटेक्स ने 27,246 तर स्मॉल्कॅप इंडेक्स ने 30, 416 अंकांची वाढ नोंदविली, जी वर्षभरातील त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.
2022 मधील शेअर मार्केटची काय असेल दिशा दिशा
स्टँडर्ड चार्टर्ड नुसार ,2022 मध्ये शेअर मार्केटमध्ये चढ-उतार दिसून येऊ शकतो. तसेच कोरोना संकट वाढले नाही तर, मार्केटमध्ये स्थिरता ही येऊ शकते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत असून कोरोनाचे संकट जरी आले तरी अर्थव्यवस्था कमजोर होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र वाढती महागाई आणि इंधनाचे वाढते भाव यामुळे चिंतेचे वातावरण जरूर आहे. सर्व श्रेणीत इक्विटी शेअर चांगली कामगिरी करतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या स्टॉक मध्ये गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. मात्र दुसरीकडे भारत इंधनासाठी इतर देशावर अवलंबून असल्याने त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होऊ शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सरत्या वर्षात अनेक ब्रोकर हाऊसने कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याचा अंदाज वर्तविला आहे त्याचा अभ्यास करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता.