मुंबई: डिजिटल अर्थात कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे अनेक जण क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या (Credit-Debit Card) मदतीने व्यवहार करतात. हे व्यवहार सुरक्षित असले, तरी लहानसा निष्काळजीपणाही मोठा आर्थिक भुर्दंड पडण्यास कारणीभूत ठरु शकतो. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवले अथवा चोरीला गेले, तर अनेकांना घाबरुनच काही सुचेनासे होते. मात्र, तुमच्यावर अशी परिस्थिती ओढावल्यास घाबरून जाऊ नका. त्याऐवजी तातडीने हालचाली करून बँकेला कळवल्यास तुमच्या क्रेडिट कार्डाचा गैरवापर टाळता येऊ शकतो.
तुम्हाला इंटरनेटवर तुमच्या बँकेचा हेल्पलाईन नंबर मिळू शकतो. याशिवाय, तुमच्या क्रेडिट कार्डाच्या स्टेटमेंटवरही हेल्पलाईन नंबर असतो. या क्रमांकावर फोन करुन तुम्ही क्रेडिट कार्ड गहाळ झाल्याची माहिती देऊ शकता. जेणेकरून बँकेकडून तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात येईल.
तुम्ही बँकेच्या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर तुम्हाला अकाऊंट नंबर विचारला जाईल. क्रेडिट कार्ड कधी गहाळ झाले ती वेळ सांगावी लागेल. तसेच तुम्ही क्रेडिट कार्डाचा शेवटचा वापर कधी केला, याची माहितीही बँकेला द्यावी लागेल.
बँक एक्झिक्युटिव्हच्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या
तुमची ओळख पटवण्यासाठी फोनवरुन बँकेचे एक्झिक्युटिव्ह काही प्रश्न विचारतील. जसे तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, आई-वडिलांचे नाव, शेवटचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड कधी वापरले होते, याची माहिती.
पोलिस स्थानकात तक्रार नोंदवा
बँकेच्या कस्टमर केअरला तुमची ओळख पटल्यानंतर कार्ड ब्लॉक होईल. मात्र अतिरिक्त खबरदारी म्हणून तुम्ही जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार नोंदवा. एफआयआरची एक प्रत तुमच्या बँकेच्या शाखेलाही पाठवा
क्रेडिट कार्डाचा विमा
क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर कार्ड विमा तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. कार्ड हरवल्याची सूचना बँकेला दिल्यानंतरही कुठला गैरव्यवहार झाला, तर त्याची जबाबदारी तुमची नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही कार्ड इन्शुरन्स कंपनीला माहिती द्या. मात्र बँकेला रिपोर्ट करण्याआधीच्या काळात चोराने कुठला व्यवहार केला असेल, तर त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेणार नाही. (Bank Credit Card Debit Card Lost or Stolen take five steps immediately)
तर कार्डावरुन व्यवहार करण्यास थांबा
क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चोरीला गेल्याच्या समजातून तुम्ही बँकेला रिपोर्ट केले आणि तेवढ्यात तुम्हाला तुमचे हरवलेले कार्ड सापडले, तरी त्यावरुन तात्काळ कोणताही व्यवहार करु नका.
इतर बातम्या: