नवी दिल्ली : वैयक्तिक गरजांच्या पूर्ततेसाठी वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) पर्याय अनेकजण अजमावितात. मात्र, तुम्ही सोने तारण कर्जाद्वारे (Gold Loan) आवश्यक पैसा उभा करू शकतात. अपुरी माहिती किंवा पूर्वग्रहांमुळे सोने तारण कर्जाऐवजी वैयक्तिक कर्जाला अधिक प्राधान्य मिळते. अर्थजगतातील अभ्यासकांच्या मतानुसार सोने तारण कर्ज हे वैयक्तिक कर्जापेक्षा (Gold loan vs personal loan) अधिक फायदेशीर आहे. तुमच्याकडे अतिरिक्त सोने आहे आणि तुम्हाला पैशांची आवश्यकता असल्यास सोने तारण कर्जाचा पर्याय तुम्ही नक्कीच अजमावून पाहायला हवा.
वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत सोने कर्जावर व्याजाचे दर कमी असतात. सोने कर्जावर जोखीम कमी असल्यामुळे बँकाकडून कमी व्याजदराची आकारणी केली जाते. बँक बाजार डॉट कॉम वरील माहितीनुसार सोने तारण कर्जावरील व्याजदराची सुरुवात 7.1 टक्क्यांपासून होते. वैयक्तिक कर्जावरील व्याजदरास आरंभ 8.3 टक्क्यांवरुन होते. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत सोने तारण कर्जावरील व्याजदर 1-1.5 टक्क्यांनी कमी आहे.
वैयक्तिक कर्ज मंजुरीचा प्रस्ताव सादर करावा लागतो. उत्पन्नाच्या साधनांच्या आधारावर कर्जदाराचे मूल्यमापन केले जाते. वैयक्तिक कर्जासाठी एकाधिक कागदपत्रांची आवश्यकता भासते. त्यामुळे वैयक्तिक कर्ज मंजुरीसाठी अधिक कालावधी लागतो. आपत्कालीन कामासाठी पैसे हवे असल्यास सोने तारण कर्ज तुम्हाला फायदेशीर ठरेल. कमी कागदपत्रांसह सोने तारण कर्जाला तत्काळ मान्यता दिली जाते.
तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असल्यास तुम्हाला अधिक दराने वैयक्तिक कर्ज मिळू शकते किंवा तुमचा मंजुरी अर्ज फेटाळला जावू शकतो. अशापरिस्थितीत सोने तारण कर्ज तुमच्यासाठी नक्कीच तारणहार ठरेल. सोने कर्जासाठी तुमचा सिबिल स्कोअर नक्कीच तपासला जाईल. मात्र, सोने तारण कर्ज सुरक्षित असल्याने तुम्हाला कर्ज नक्कीच मिळेल. बँकनिहाय सोन्याच्या किंमतीनुसार कर्जाची रक्कम भिन्न असू शकते.
सोने तारण कर्जाचा दुहेरी फायदा सांगितला जातो. सोने तारण कर्जामुळे बँकेत सोने सुरक्षित राहते तसेच रक्कमही उपलब्ध होते. या रकमेवरुन आवश्यक कामे पूर्ण केली जाऊ शकतात. मात्र, तुम्ही सर्व सोने तारण कर्जावरील व्याज अदा केल्यानंतरच तुम्हाला सोने वापरता येईल.
सोने तारण कर्जाचे लाभ
• अन्य कर्ज प्रकारांच्या सापेक्ष कमी व्याजदर
• कर्ज प्राप्तीसाठी किमान कागदपत्रे, त्रासमुक्त प्रक्रिया
• सोन्याच्या बँकेत सुरक्षेसोबत पैशांची प्राप्ती
• सिबिल स्कोअरची चिंता नाही
• आपत्कालीन परिस्थितीत तासाच्या आत पैसे
शेअर्स तारण ठेऊन मिळवा कर्ज, देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करा व्यवहार