नोकरदारांसाठी कर (Tax) सवलत मिळवण्यासाठी फक्त गुंतवणूक करणे हा एकमेव पर्याय नाही. एका आर्थिक वर्षात जेवढी तुम्ही गुंतवणूक (Investment) केली आहे, त्याचे कागदपत्रं तुम्हाला एचआर विभागाकडे सादर करावे लागतात. साधारणपणे कंपन्या गुंतवणुकीचे कागदपत्रं जमा करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदत देतात. मात्र,काही कंपन्यांची अंतिम दिनांक हा वेगळा असू शकतो. जर तुम्ही अद्याप गुंतवणुकीचे कागदपत्र (Documents) जमा केली नसल्यास लवकर जमा करा. कागदपत्रं जमा न केल्यास तुमचा मार्च महिन्यातील पगारातून एक रक्कमी कर वजा केला जाऊ शकतो. आयकर नियम 80 सी नुसार 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. या गुंतवणुकीत जीवन विम्याचा हप्ता, पीपीएफ, ईएलएसएस, एनएससी, पाच वर्षांची एफडी, गृहकर्जावरील मूळ रक्कमेची परतफेड, ईपीएफ गुंतवणूक आणि दोन मुलांचं शैक्षणिक शुल्काचा यात समावेश आहे.
या आर्थिक वर्षात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीसंदर्भातील पावत्या जमा करा. दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक शुल्क, गृह कर्ज, पीपीएफमधील गुंतवणुकीची तपासणी करा. यानंतर गरज असल्यास 80 सी अंतर्गत गुंतवणूक करा. लक्षात ठेवा 80 सी अंतर्गत फक्त दीड लाख रुपयांपर्यंतच कर सवलत मिळते. कर्मचाऱ्यांना घर भाड्यावरही कर सवलत मिळते. घर भाड्यावरील सूट ही 80 सी पेक्षा वेगळी असते. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भाडे पावती जमा करावी लागते. जर वार्षिक घर भाडं एक लाख रुपायंपेक्षा जास्त असल्यास घर मालकांचं बँक खातं आणि पॅन कार्डची माहिती द्यावी लागते.
80 सी शिवाय इतर पर्यायही करसवलतीसाठी उपलब्ध आहेत. गृहकर्जाचा हप्ता भरत असताना व्याज भरण्यासाठी किती रक्कम दिली आहे, याची नोंद तुम्ही करू शकता. कलम 24 बी अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्याज परतफेडीवर सूट मिळते. शैक्षणिक कर्जाच्या व्याजाच्या परतफेडीवरही लाभ मिळतो. आरोग्य विम्याच्या 25 हजार रुपयांच्या हफ्त्यावरही 80 डी अंतर्गत सवलतीचा लाभ घेता येतो. जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांसाठी आरोग्य विमा खरेदी केला असल्यास अशा वेळी 25 हजार रुपयांपर्यंतच्या करसवलतीचा लाभ घेऊ शकता. जर आई-वडील ज्येष्ठ नागरिक असल्यास हीच सवलच 50 हजार रुपयांपर्यंत मिळते. जर तम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक केली असल्यास अटीशर्थीसह तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
दिलासादायक! राज्यात सीएनजी होणार स्वस्त, व्हॅट कपातीची अधिसूचना जारी