पुण्यात वाहनांच्या तोडफोडीनंतर नाशकात तोडफोड सत्र सुरू; तलवारी आणि कोयत्याने काचा फोडल्या
पिंपरी-चिंचवड आणि सहकारनगर परिसरात कोयता गँगकडून दहशत माजवण्याचा कारनामा समोर आला होता. येथील सहकारनगरमधील चव्हाणनगर आणि शांतीनगर वाहनांच्या तोडफोड करत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आली होती.
नाशिक | 25 जुलै 2023 : काहीच दिवसांच्याआधी पुणे जिल्ह्यातील शहरातील पिंपरी-चिंचवड आणि सहकारनगर परिसरात कोयता गँगकडून दहशत माजवण्याचा कारनामा समोर आला होता. येथील सहकारनगरमधील चव्हाणनगर आणि शांतीनगर वाहनांच्या तोडफोड करत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकरोड भागातही अशीच तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. येथे मध्यरात्री गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून धोंगडे मळा परिसरातील 4 ते 5 वाहनं फोडण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे २४ तासांत दुसरी तोडफोडीची घटना घडली असून वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे आता शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. तर काल विहितगाव येथे तोडफोड झाली होती. त्याच्याआधी देखील १२ जुलैलाही सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड झाली होती. त्यानंतर आता नाशिकरोड भागात ४ ते ५ वाहनांची तलवारी आणि कोयत्याने काचा फोडल्या आहेत.