शरद पवार गटाला धक्का, ठाण्यात उपाध्यक्षावर गुन्हा दाखल; नेमंक काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने अजित पवार गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या हातात गेल्याचे दिसत आहे. तर शरद पवार गटातील नेत्यांची नावं काही ना काही कारणानं पुढे येत आहेत.
ठाणे, 13 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला धक्क्यावर धक्के बसने काही कमी झालेले नाही. गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने अजित पवार गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या हातात गेल्याचे दिसत आहे. तर शरद पवार गटातील नेत्यांची नावं काही ना काही कारणानं पुढे येत आहेत. आताही पवार गटाचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा देसाई यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी राबोडी येथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करत अतिक्रमणावर बडगा उगारला होता. त्यावेळी सुहास देसाई यांनी त्या कारवाईस विरोध केला होता. तर कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. त्याप्रकरणी आता महापालिकेच्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. तर या तक्रारीवरून देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.