‘सुलतान’ला धोबीपछाड देण्यासाठी महिला घडविणार ‘दंगल’
राज्यात महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आलीय. महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा राज्यात खेळविण्यात येणार आहे.
पुणे : सलमान खानचा ( Salman Khan ) सुलतान आणि अमीर खान ( Amir Khan ) याचा दंगल या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. कुस्ती खेळावर आधारित या सिनेमाना प्रेक्षकांनीही चांगली पसंती दिली होती. तोच उत्साह आणि जोश आता पुणे येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिसून येत आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे पुण्यात आगमन झालंय. शिंदे गटाच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुणे येथे बृजभूषण शरण सिंह यांची भेट घेतली. या भेटीत दीपाली सय्यद यांनी एक महत्वाची मागणी केलीय.
गेली ६५ वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुरुषांसाठी खेळविली जात आहे. मात्र, ही स्पर्धा महिलांसाठीही घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गेली चार वर्ष त्या परवानगी मागत आहे. पण, आता राज्यात महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा घेण्याची परवानगी मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ही स्पर्धा महाराष्ट्र्र होणार आहे.