गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, एकाच गाडीतून मुख्यमंत्र्यासोबत प्रवास
अभिनेता गोविंदा याने पुन्हा राजकारणात एण्ट्री केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोविंदा याने प्रवेश करीत पुन्हा राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे. आता गोंविदाला उत्तर -पश्चिम मुंबईतून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई : अभिनेता गोंविदा याने 14 वर्षांनंतर पुन्हा राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. गोविंदा याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वायव्य मुंबई ( उत्तर-पश्चिम मुंबई ) उमेदवारी देण्याची तयारी दर्शविल्याचे म्हटले जात आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आता अमोल किर्तिकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गोविंदा याच्या प्रवेशाने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. अभिनेता गोंविदा याने यापूर्वी साल 2004 साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्याने भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्याला कॉंग्रेसने राजकारणात आणले होते. परंतू राजकारणात त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा अभिनयाकडे आपला मोर्चा वळवित राजकारणाला रामराम केला होता. आता गोंविदा याने पुन्हा राजकारणात येण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा आसरा घेतला आहे. गोंविदाला जर उत्तर-पश्चिम मुंबईतून तिकीट दिले तर अमोल किर्तिकर यांना तगडी फाईट मिळण्याची शक्यता आहे.