SIKANDAR SHAIKH : जो जिता वही ‘सिकंदर’, पण पराभवानंतरही हा ‘सिकंदर’ म्हणतो, माझ्यासाठी आनंदाश्रू
मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये हरलेला सिकंदर शेख याच्या पराभवामुळे त्याच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे.
पुणे : सोलापूर ( SOLAPUR ) जिल्ह्यातील मोहोळ ( MOHOL ) तालुक्यातील सिकंदर शेख ( SIKANDAR SHAIKH ) महाराष्ट्र केसरीचा ( MAHARASHTRA KESARI ) प्रमुख दावेदार मानला जात होता. पण, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये त्याचा पराभव झाला. पराभवानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल माध्यमांवर आयोजक आणि पंच यांच्यावर निरनिराळे आरोप केले आहेत.
घरात अठराविश्व दारिद्र असलेल्या कुटुंबात जन्म झालेल्या आणि हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा या हरलेल्या सिकंदर शेख याचा प्रवास आहे. तो यापुढेही चालू राहील. पण, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेला पराभव त्याच्या जिव्हारी लागला आहे.
आपला पराभव त्याने मान्य केला आहे. यात तो कुणालाही दोषी मानत नाही. पण, पराभव कसा झाला हे मला विचारण्यापेक्षा कमिटीला विचारा असे म्हणत तो बरंच काही सांगून जातो. कदाचित जे झाले ते माझ्यासाठी यातून पुढे काही चांगले होईल यासाठी असेल. महाराष्ट्रात माझे जे फॅन आहेत त्याच्या डोळ्यात एक दिवस माझ्यासाठी आनंदाश्रू येतील. तो दिवस येणारच, असे म्हणत ‘सिकंदर कभी हरता नही’ याचेच उदाहरण दिले आहे.