‘धमकी देणारा जास्त वेळ बाहेर राहू शकणार नाही’; धमकी आल्यानंतर रवी राणा यांची प्रतिक्रिया
याच्या आधी देखील २०२२ साली राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी स्थानिक राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
अमरावती : गेल्या दोन दिवसापासून राज्यात धमकी सत्र पहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावरून सध्या तपास सुरू असताना आता बडनेराचे आमदार आणि खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावरून देखील आता खळबळ उडाली आहे. या धमकी देणाऱ्या संबंधित तरुणाविरुद्ध राणा यांनी पोलीसांत तक्रार दिली आहे. ही तक्रार त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी स्थानिक राजापेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून आपली प्रतिक्रिया देताना, राणा यांनी खालच्या पातळीवर शब्द वारत धमकी आल्याचे सांगताना, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे. फडणीस हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यामुळे धमकी देणारा लवकरच उघड होईल. तर तो लवकरच गजाआड असेलही त्यांनी म्हटलं आहे. तर याच्या आधी देखील २०२२ साली राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी स्थानिक राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.