जॅक डोर्सी दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; केली कोणती मागणी?
भारतातील शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने त्यांना ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या अनेक भारतीय पत्रकारांची खाती बंद करण्यास सांगितले होते, असा दावा जॅक डोर्सी यांनी केला. जॅक डोर्सीच्या या आरोपांनंतर भारतातील लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
मुंबई : ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी एका मुलाखतीत दावा केला आहे की, भारतातील शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने त्यांना ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या अनेक भारतीय पत्रकारांची खाती बंद करण्यास सांगितले होते, असा दावा जॅक डोर्सी यांनी केला. जॅक डोर्सीच्या या आरोपांनंतर भारतातील लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत यावर ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी, दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. हा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांचा खुलासा धक्कादायक आहे. सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता तसेच सरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर त्या व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी.