Beed Crime : अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची खोचक टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर चार आरोपींना अटक झाली तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणात निरनिराळे दावे करीत असल्याने त्यांना या प्रकरणातून दूर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या हत्येला आता जवळपास महिला होत आला तरी तीन आरोपी फरार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यात ठाण मांडून बसल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येतील तीन फरार आरोपीसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मध्यंतरी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. त्यांनी तिघा जणांचे मृतदेह कर्नाटक सीमेवर आढळल्याचा कॉल अज्ञातांनी आपल्याला केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना पाचारण करुन शहानिशा केली होती. त्यात प्रथमदर्शनी काहीही तथ्य आढलेले नाही. अंजली दमानिया या संतोष देशमुख प्रकरणाची दीशाभूल करीत असल्याने त्यांना पोलिस अधिक्षकांना दूर करावे, त्या कोणाच्या रिचार्जवर चालतात असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ट्वीटरवर केला आहे.