शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदे यांची मोठी घोषणा
अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार, असे म्हणत बबनराव शिंदे यांनी मोठी राजकीय घोषणा केली आहे.
महायुतीचा विषय संपलाय असं म्हणत आमदार बबनराव शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार, असा निर्धारच व्यक्त करत ही घोषणा केल्याचे पाहायला मिळत आहे. माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे विद्यामान आमदार आहेत. गेल्या सहा टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत असल्याने माढ्यात त्यांनी मोठी राजकीय ताकद असल्याचे पाहायला मिळत आहे. बबनराव शिंदे यांना हे आता निवडणूक लढण्यासाठी इच्छूक नसून त्यांना त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना राजकीय आखाड्यात उतरवायचे आहे. तर शरद पवारांकडे तिकीटाची मागणी केली आहे. ते तिकीट देतील की नाही हे मला माहिती नाही. पण यंदाच्या निवडणुकीत माझा मुलगा रणजितसिंहला शरद पवारांनी तिकीट दिले तर ठिक, नाहीतर अपक्ष निवडणुकीला सामोरे जाईल, असं बबनराव शिंदे म्हणाले. दरम्यान, बबनराव शिंदे हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीनंतर बबनराव शिंदे यांनी आपल्या पुत्राला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासंदर्भात मोठी घोषणा केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा मोठा राजकीय धक्का आहे.