Ajit Pawar | ‘तुम्ही शिवसेनेच्या, ते ही शिवसेनेचे, तुमचं तुम्ही बघा आता…’ अजित पवारांचं निलम गोऱ्हेंना मिश्किल उत्तर
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या सडेतोड भाषण आणि चोख प्रत्युत्तरासाठी चांगलेच परिचित आहेत. एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई'च्या लोकार्पण सोहळ्यातही त्याचा प्रत्यय आला.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या सडेतोड भाषण आणि चोख प्रत्युत्तरासाठी चांगलेच परिचित आहेत. एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’च्या लोकार्पण सोहळ्यातही त्याचा प्रत्यय आला. कार्यक्रमस्थळी वेळेत येण्यासाठी अजित पवार ओळखले जातात. आजही ते कार्यक्रमाला वेळेच्या अर्धा तास आधीच पोहोचले. त्यावर बोलताना निलम गोऱ्हे यांनी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर अजित पवार यांनीही आपल्या भाषणात कोटी करत निलम गोऱ्हेंची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं.
‘तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, कार्यशील आहात. आमच्याही प्रश्नांना तुम्ही वेगाने न्याय मिळवून देता. पण कार्यक्रम पुण्यात असतो त्यावेळी मी आता विचार करत आहे की संयोजकांना सांगावं का, की आदल्या दिवशी आमची झोपायची व्यवस्था इथे करा. कारण कितीही तुमच्यापेक्षा लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही आमच्या आधीच येऊन पोहोचलेले असता’, अशी टिप्पणी निलम गोऱ्हे यांनी केली. त्यावर बोलताना अजित पवार यांनीही गोऱ्हे यांनी फिरकी घेतली. ‘तुम्ही एकदम परफेक्ट टाईमिंगला आलात त्यामुळे काळजी करु नका. तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो पण परबसाहे म्हणले आता वेळ व्हायला आला आहे आपण सुरु करु. त्यामुळे त्यांनीच सुरु केलं लवकर. मी म्हणालो होतो की निलमताई येत आहेत, त्या उपसभापती आहेत, 9 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे. पण परबसाहेबांनी ऐकलं नाही त्याला मी काय करणार. आता ते शिवसेनेचे, तुम्ही शिवसेनेच्या… बघा तुमचं तुम्ही काय ते’, असं अजित पवार म्हणाले.