“शिंदे नंबर 1 चे मुख्यमंत्री, मग निवडणुकांची भीती का वाटते?”, अजित पवार यांनी उडवली खिल्ली!
'राष्ट्रात मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे' शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजप-शिवसेनेवर निशाणा साधला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे.
मुंबई : ‘राष्ट्रात मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे’ शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजप-शिवसेनेवर निशाणा साधला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे किंवा ती जाहिरात देणारे एवढ्या लवकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले ते मला काही कळलं नाही. कारण मुळातच त्यांनी आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत असं म्हणत शिवसेना पक्ष स्वत:कडे खेचून घेतला. पण त्यांच्या जाहिरातीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसला नाही”. तसेच “स्वत:च ठरवून सर्वेक्षण केलं. कुणी सर्वेक्षण केलं, एक्झिट पोल येतात तेव्हा तो सर्व्हे कुणी केला ते सांगितलं जातं. विशेष म्हणजे त्या जाहिरातीत जो सर्व्हे दाखवलाय त्यानुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी लोकांनी सर्वाधिक कौल दिलेला आहे. त्यांना एक नंबर देण्यात आला आहे. मला खूप आनंद वाटला की चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला एकनाथ शिंदे हेच पुढे मुख्यमंत्री व्हावे, असं वाटत आहे. इतक्या लोकांचा पाठींबा आहे तर मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका का घेत नाहीत? त्यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते”, असंही अजित पवार म्हणाले.