अजितदादा म्हणताय, ‘मी आता बराच नम्र झालोय अन्…’,गुलाबी मेकओव्हरनंतर राष्ट्रवादीच्या रणनितीत बदल?
जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून आपण नम्र झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. हाच नम्रपणा पुढे टिकावा यासाठी प्रार्थना करा, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या समर्थकांना देखील नम्र वागण्याचा सल्ला दिला आहे.
आपण आता नम्र झालोय आणि तसाच राहिल अशी प्रार्थना करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. मागच्या काही काळापासून महायुतीतून होणाऱ्या टीकेवरून अजित पवार यांनी थेट उत्तर देणं टाळताय तर त्याउलट इतर नेते आणि प्रवक्ते आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अजित पवार यांचा हा नम्रपणा त्यांच्या पक्षाच्या नव्या रणनितीनुसार ठरल्याचे बोललं जात आहे. म्हणजे इतर नेते आणि प्रवक्त्यांनी आक्रमक उत्तर द्यायची पण प्रमुख नेत्यानं सबुरीने बोलायचं. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पण फडणवीस कधीच जरांगे पाटलांना थेट उत्तर देत नाहीत, तर त्यांच्याऐवजी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि नितेश राणे हे आक्रमकपणे जरांगे पाटील यांच्यावर बोलताना दिसताय तर दुसरीकडे अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेवर दादा थेटपणे कोणतंही प्रत्युत्तर न देता अमोल मिटकरी, सूरज चव्हाण आणि रूपाली ठोंबरे पाटील या उत्तर देतायंत. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांनीच दादांवर टीका केली. तर त्यांच्यामुळे नुकसान होत असल्याचा आरोपही केला गेला. मात्र यावर अजित पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.