Video :’भाजपाशी विचार जुळले म्हणून…,’ काय म्हणाले अंबादास दानवे
आपण भाजपात जाणार असल्याच्या बातम्या अत्यंत निराधार असून त्या चॅनलने त्यांचा टीआरपी वाढविण्यासाठी चालविल्या असल्याचा आरोप शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला आहे. आपल्याला संभाजीनगरातून तिकीट मिळाले नसले तरी आता आपण चंद्रकांत खैरे यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : मी गेल्या तीस वर्षांपासून शिवसैनिक आहे. मी शिवसेना सोडणार नाही. मला संभाजीनगरमधून लोकसभा लढवायची होती ही गोष्ट खरी आहे. म्हणून आपण भाजपात जाणार हे चुकीचे वृत्त असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. चॅनलने त्यांचा टीआरपी वाढविण्यासाठी या बातम्या दिल्याचा आरोपही यावेळी अंबादास दानवे यांनी केला आहे. संभाजीनगरची जागा लढविण्याची माझी इच्छा होती ही गोष्ट खरी आहे. मी त्यासाठी नाराज होतो. तुम्ही कधी नाराज होत नाही का ? असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केला आहे. ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी आपण काम करणार आहोत. भाजपाच्या विचाराचे असल्याचा आरोप होत आहे यावर भाजप आणि शिवसेना यांची युती 25 वर्षे एकाच विचारावर होती. त्यामुळे या आरोपावर काही अर्थ नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना असून ती बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वाढली आणि आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण काम करीत असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट करीत भाजपात जाणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.