राज ठाकरे यांच्या त्या टीकेला अजित पवार गटाच्या नेत्याचा जशाच तसं प्रत्युत्तर; कोहिनूर मिलच्या मुद्द्यावर केली टीका
राज ठाकरे यांनी पनवेलमधील मुंबई गोवा महामार्गाबाबत निर्धार मेळाव्यात अजित पवार यांच्या भूमिकेवरून जोरदार टीका केली होती. तर जे गुप्त भेटीनंतर गाडीतून झोपून गेले असा टोला लगावला होता. त्यावरून अजित पवार गटाच्या आमदाराने राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय
मुंबई : 17 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजप शिंदे गटासह अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मुंबई गोवा महामार्गाबाबत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी, अजित पवार यांना खोचक टोला लगावताना त्यांची नक्कल केली. कनपट्टीवर बंदुक ठेवून भाजप लोकांना पक्षात आणतय आणि मग हेच लोक गाडीत लपून जातात असा टोला देखील लगावला होता. त्यावर अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मिटकरी यांनी, शेवटी गाडीतून लपून कोण कोण जात? गाडीचे काचा कोणाच्या काळ्या आहेत हे देखील लोकांना माहित आहे. तर कोहिनूर मिलनंतर ज्यांना ईडीची नोटीस आली आणि त्यानंतर ज्यांनी भूमिका बदलल्या त्या लोकांनी अशी भाषा करू नये. शेवटी लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार असल्याचा टोला देखील मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.