‘लोकसभेचा माझा मार्ग मोकळा’; तटकरे अजित पवार गटात गेल्याने ठाकरे गटाचा हा नेता खूश
आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यादरम्यान अजित पवार गट हा थेट भाजपबरोबर गेल्याने मोठी अडचण दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्याने थेट अजित पवार गटाच्या नेत्यालाच डिवचले आहे.
रायगड 21 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार हे भाजपबरोबर गेले. त्यांच्याबरोबर ३० एक आमदार देखील गेले. त्यामुळे महाविकास आघाडीतील मोठी अडचण दूर झाल्याचे तर आता जागावाटपात कोणतीच अडचण होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचदरम्यान याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी सुनिल तटकरे यांना डिवचले आहे. गीते यांनी, सुनिल तटकरेंना दुर्बुद्धी झाली, आणि ते भाजपसोबत गेले. आता लोकसभेचा माझा मार्ग मोकळा झाला असे मोठं विधान केलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म पाळणे गरजेचे होते. मात्र आता अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. आणि तटकरे यांना दुर्बुद्धी झाली आणि ते देखील त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे आता माझा रायगड रत्नागिती लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मला आदेश दिले आहेत. त्यामुळे आज पाली बल्लाळेश्वराच्या आशीर्वादाने लोकसभेचा हा पहिला मेळावा घेत आहे. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागा अस म्हटलं आहे. ते पालीतील शिवसैनिक मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते.