Andhra Pradesh Mysterious Rath : श्रीकाकुलम येथील सुन्नापल्लीच्या किनाऱ्यावर आढळला सोनेरी रथ
असानी या चक्रीवादळाचा तडाखा आता आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू राज्यांना बसताना पाहायला मिळत आहे. या राज्यात सकाळपासूनच जोरदार वारे वाहत आहेत. तसंच पावसालाही सुरुवात झाली आहे. असानी चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा सरकार हाय अलर्टवर आहेत. चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई : असानी चक्रीवादळाच्या (Asani Cyclone) दरम्यान आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीकाकुलम येथील सुन्नापल्लीमध्ये सी हार्बर येथे सोनेरी रंगाचा रथ सापडला आहे. काल संध्याकाळी सोनेरी रंगाचा सुंदर रथ वाहत इथे आला. हा रथ म्यानमार, मलेशिया किंवा थायलंडमधून वाहत-वाहत इथंपर्यंत पोहोचला असल्याचे सांगितले जात आहे. संताबोमाली तहसीलदार जे चलमैय्या हे या सगळ्या प्रकरणावर बोलते झालेत. त्यांनी म्हणाले की, “हा रथ इतर कोणत्याही देशातून आलेला नसावा. रथाचा वापर भारतीय किनारपट्टीवर कुठेतरी चित्रपट चित्रित करण्यासाठी केला गेला असावा. पण उच्च भरतीच्या हालचालींमुळे ते श्रीकाकुलम किनाऱ्यावर आला असावा.” नौपाड्याच्या एसआय यांनी सांगितलं की, “हा रथ दुसऱ्या देशातून आला असावा. आम्ही गुप्तचर विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आहे. ते याबाबत अधिक तपास करतील.” त्यामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील सुन्नापल्लीमध्ये सी हार्बर येथे सापडलेला हा सोन्याचा रथ (Golden Chariot) नेमका कुठला आहे. तो इथे कसा आला याविषयी स्पष्टता नाही. मात्र किनारपट्टी लगत सापडलेल्या या सोन्याच्या रथाची चर्चा मात्र जोरदार आहे.