अजितदादांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? राष्ट्रवादीचा नेता म्हणतो, “मुख्यमंत्र्यांचे दिवस…”
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गट नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.
गडचिरोली : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाची कोंडी झाल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गट नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. गडचिरोलीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असताना पत्रकारांशी ते बोलत होते. “अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यांना काय आश्वासन दिलं की नाही दिलं, हे गुलदस्त्यात आहे. मात्र ते सत्तेत सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यांना वाटते आपले दिवस भरलेले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वांना लागू होत असून वर गेलेली वस्तू खाली पडणारच,” असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे. “भाजप ईडी, सीबीआयचे धाक दाखवून फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आणखी बळकट होणार आहे,” असं अनिल देशमुख म्हणाले.