परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर आवडेल का ?, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखेर आश्वासन दिले की यापुढे..
अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरु असताना पीठासिन अधिकारी असो वा सभापती किंवा उपसभापती प्रत्येकाला त्या आसनावरुन शिक्षकाची भूमिका बजवावी लागत असते. जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. शिवसेना सदस्य अनिल परब यांना नीलम गोऱ्हे यांनी बोललेले शब्द टोचले अखेर मग त्यांनी त्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली...
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसामुळे आज सोमवारी अनेक लोकप्रतिनिधी रेल्वेच्या गोंधळामुळे सभागृहात पोहचू शकले नाहीत. त्यामुळे आज आमदारांची संख्या खूपच कमी होती. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी यावेळी एक खंत मांडली. आपण भूमिका मांडत असताना पोटतिडकीने मांडत असतो. आपल्याला आपले म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू काल मी सभागृहातील कामकाजाचा व्हिडीओ पाहीला त्यात तुम्ही मला असे म्हणाला की मी उद्धव ठाकरे यांना इम्प्रेस करण्यासाठी मोठ्याने बोलतो ? माझा आवाजच मोठा आहे. मला माझे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यावर अशी टिपण्णी करायला नको होती असेही परब यांनी निदर्शनास आणून दिले.
आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नीलम गोऱ्हे यांना अनिल परब यांनी चूक लक्षात आणून दिली. त्यावर नाराजीही व्यक्त केली ज्यानंतर नीलम गोऱ्हेंनी मी अनावधानाने ते बोलून गेले म्हटलं आहे. अनिल परब पुढे म्हणाले की सभागृहाच्या प्रमुख आहात, आम्हाला शिक्षा करण्याचा तसेच शांत बसविण्याचा तु्म्हाला अधिकार आहे. आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखविण्यासाठी असे करता का असे आपण मला म्हणाला, अशा प्रकारे मला तुम्ही बोलू शकत नाही की मी पक्ष प्रमुखांना कशाला इम्प्रेस करु ? मग मी असे म्हटले तर तुम्हाला किती वाईट वाटेल ? की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही बोलताय ? परंतू मी आपणास असे बोलणार नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
माझे काम आवडले म्हणून मंत्री केले आमदार केले
मी योग्य काम करीत असल्याने येथे आहे. त्यासाठी मला वेगळे इम्प्रेस करायची काय गरज ? तुम्ही हे तुमचे वक्तव्य कामकाजातून काढून टाका अशीही विनंती अनिल परब यांनी यावेळी केली. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खरंतर तुम्ही विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही सदस्य एकाच वेळी बोलत असता. त्यामुळे माझाही कधी तरी तोल ढळतो. सभागृहात सर्वांना संधी द्यायचा माझा प्रयत्न असतो. मी काही यंत्रमानव नाही तुमच्यासारखीच माणूस आहे. सद्गुणांचा पुतळा नाही. परंतू मी कामकाज पुन्हा तपासून पाहते आणि अनावश्यक भाग असेल तर कामकाजातून वगळते. तुम्हाला माझे बोलणं लागलं, तुम्ही इतके संवेदनशील आहात. तर यापुढे मी तुम्हाला बोलताना नक्कीच विचार करेल असे उपासभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.