Jalgaon : वेदांतावरुन राजकारण सुरुच, भाजप खासदाराची मागणी सरकारकडे अन् निशाणा शिवसेनेवर

| Updated on: Sep 25, 2022 | 3:55 PM

गुजरात राज्याने तीन वर्षापुर्वीच सेमीकंडक्टर पॉलिसी आणली. त्यामाध्यमातून राज्याचा विकास साधला गेला. पण मविआ सरकारने ते धाडस का दाखवले नाही, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.

जळगाव : वेदांता प्रकल्प (Vedanta Project) हा गुजरातला गेला असला तरी महाराष्ट्रात मात्र, आरोप-प्रत्यारोपाचे गुऱ्हाळ हे सुरुच आहे. शिवसेना आणि शिंदे (Politics) गटात आरोप-प्रत्यारोप होत असले तरी यामध्ये आता भाजपानेही आता उडी घेतली आहे. वेदांता प्रकरणी आदित्य ठाकरे हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भाजपाचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी तर थेट सीबीआयकडेच चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे प्रकल्प गेला तरी चर्चेचे गुऱ्हाळ हे सुरुच आहे.

वेदांता प्रकल्पावरुन शिंदे सरकारवर टीका केली जात असली आता त्यांच्याकडूनही उत्तर दिले जात आहे. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारमुळेच गुजरातला गेला आहे. आदित्य ठाकरे हे मंत्री होते तेव्हा किती दिवस मंत्रालयात आले असा सवाल उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला.

वेदांता प्रकरणाबाबत दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रथम अंतर्मनाला विचारलं पाहिजे की हा प्रकल्प कशामुळे गेला ते. पॉलिसी मेकर असताना आपण किती दिवस मंत्रालयात हजेरी लावली असा सावलही त्यांनी उपस्थित केला.

गुजरात राज्याने तीन वर्षापुर्वीच सेमीकंडक्टर पॉलिसी आणली. त्यामाध्यमातून राज्याचा विकास साधला गेला. पण मविआ सरकारने ते धाडस का दाखवले नाही. विकासाचा अजेंडाच नसल्यामुळे मविआच्या काळात विकास कामे झाली नसल्याचा ठपका पाटलांनी ठेवला आहे.

वेदांता प्रकल्पावरुन आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा याची सीबीआय चौकशी झाली तर सर्वकाही समोर येईल. त्यामुळे जनतेमध्ये असलेले गैरसमजही दूर होतील असा आशावाद उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Sep 25, 2022 03:48 PM