Bachchu Kadu Dance : लग्न सोहळ्यात राज्यमंत्री बच्चू कडूंचा भन्नाट डान्स, पंजाबी गाण्यावरील बच्चूभाऊंचा भांगडा एकदा पहाच
बच्चू कडू यांचं एक वेगळं रुप आज अकोल्यात पाहायला मिळालं. बच्चू कडू एका लग्न समारंभात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी एका पंजाबी गाण्यावर ठेका धरत भांगडा (Bhangada) केला!
अकोला : प्रहार संघटनेचे नेते आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) आपल्या रांगडी स्वभाव, जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी भिडण्याची वृत्ती, वेळप्रसंगी सरकारच्या धोरणांवरील टीका यामुळे ओळखले जातात. एखादा कार्यकर्ता किंवा सामान्य माणूस त्यांच्याकडे काम घेऊन गेला किंवा एखादा अधिकारी (Officer) काम करत नाही, अशी तक्रार असेल. तर बच्चू कडू जागेवरुनच त्या अधिकाऱ्याला झापतात, गरज असेल तर धमकावतात आणि त्या माणसाचे काम मार्गी लावतात. त्यामुळे सामान्य जनतेत बच्चू कडू यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. अशा बच्चू कडू यांचं एक वेगळं रुप आज अकोल्यात पाहायला मिळालं. बच्चू कडू एका लग्न समारंभात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी एका पंजाबी गाण्यावर ठेका धरत भांगडा (Bhangada) केला!
अकोलाच्या बाळापूर तालुक्यातील रिधोराजवळच्या जलसा हॉटेलवर एक लग्न होतं. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या व्यास कुटुंबातील हा लग्नसोहळा होता. या लग्नात बच्चू कडू सहभागी झाले. त्यावेळी वऱ्हाडी मंडळी पंजाबी गाण्याचा आनंद घेत होते. बाजूलाच उभे राहून बच्चू कडू हे सगळं पाहत होते. तेव्हा अचानक त्यांनी दोन्ही हात वर करत भांगडा सुरु केला. बच्चू कडूंना नाचताना पाहून लग्नघरातील मंडळींनीही त्यांच्यासोबत ठेका धरला. राज्यमंत्री म्हणून कारभार पाहणाऱ्या बच्चू कडू यांचं हे रुप अभावानेच पाहायला मिळतं.