बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना बीड गुन्हे शाखेने नोटीस पाठविली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काल शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात अनेकांना या कुटुंबाला न्याय मिळावा आणि बीड येथील गुन्हेगारीवर अंकुश बसावा अशी मागणी केली. या प्रकरणात तीन आरोपी अजूनही फरार आहेत. या फरार आरोपींना शोधण्यास एक महिना होत आला तरी यश मिळालेले नाही. दरम्यान, या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा मृतदेह कर्नाटक सीमेवर आढळण्याचा कॉल आपल्याला आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यामुळे बीड गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणातील माहिती आणि पुरावे सादर करावेत अशी नोटीस गुन्हे शाखेने दिली आहे. या संदर्भात आपण आपल्याकडील व्हॉईस कॉल डिटेल्स पोलिसांना दिल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.