‘बीड हत्या: ओबीसी नेत्यांना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,’ तायवाडे यांनी काय दिला इशारा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई केली जावी या मागणीसाठी शनिवारी बीड येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज सोमवारी बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे सकल मराठा समाजाने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक झाली आहे तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत आणि मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराड याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपण बीड सोडणार नाही अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली आहे. केवळ आरोप आहेत म्हणून धनजंय मुंडे यांचा राजीनामा मागणे योग्य नाही असे शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर अवश्य कारवाई करावी परंतू केवळ ओबीसी आहे म्हणून जर धनंजय मुंडे यांना टार्गेट करीत असतील तर ते योग्य नाही आम्ही आंदोलन करु असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. तर अशा घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत त्यामुळे केवळ मालमत्ता जप्त करुन चालणार नाही सूत्रधाराला अटक करणे गरजेचे आहे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.