सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. भराडी देवीच्या यात्रा बरीच प्रसिद्ध असल्याने देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल होत असतात. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. कोकणात जसा गणेशोत्सव महत्त्वाचा असतो तशीच कोकणता भराडी देवीच्या यात्रेची देखील भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या ५ लाख भाविक येथे दाखल झाले असून पहाटे ३ वाजेपासून मंदिर दर्शनासाठी उघडले आहे. याठिकाणी एक किलोमीटरच्या रांगा भाविकांनी लावल्या असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार असून भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत. या भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली असून ही रोषणाई उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे.