नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना (Shivsena) गहाण ठेवली आहे, असा आरोप वारंवार केला जातो. ठाकरे गटाचे नेते हे आरोप फेटाळून लावत असतात. पण पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने हे मान्य केलंय. हसत हसत मान्य केलंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना या जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वाक्यावर या नेत्याने सहमती दर्शवली आहे. हे मान्य करणारे नेते आहेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav). नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या काही सेकंद आधीचा हा व्हिडिओ आहे.
माध्यमांचे माइक लागत होते. पत्रकार परिषदेसाठी तयारी सुरु होती. यावेळी जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांच्यादरम्यान झालेल्या संवादाचा हा व्हिडिओ आहे.
पत्रकार परिषदेत मध्यभागी अजित पवार, त्यांच्या बाजूला डाव्या बाजूने भास्कर जाधव आणि त्यानंतर जयंत पाटील दिसत आहेत. अजित पवारांचं बोलणं सुरु होण्याआधी जयंत पाटील भास्कर जाधवांना म्हणतात
आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, त्यावर भास्कर जाधव हसतात आणि होकार देतात. त्या वक्तव्याचा पुनरुच्चारही करतात.
मनसे नेत्यांनी हा व्हिडिओ हेरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संतोष धुरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना, आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना.. पोटातलं ओठावर आलंच, असं म्हणत भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.
आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यावर काय प्रतिक्रिया देतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.