अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा

अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा

| Updated on: Mar 29, 2024 | 9:30 PM

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा देत नगर दक्षिणमधून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी आपण राजीनामा देतोय याचे वाईट वाटतेय, त्याबद्दल आपण माफी मागत असल्याचेही ते म्हणाले. पण आपल्याला लोकसभेत जावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मांडायचे असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नगर दक्षिणमधून ते लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी तुमचे नुकसान होऊ देणार नाही. मी त्याची भरपाई करणार असे कार्यकर्त्यांना म्हणताना अक्षरश: रडू कोसळले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयात आपण त्रास दिला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू असेही त्यांनी सांगितले. आपल्यावर आज ही वेळ का आणि कोणी आणली याबाबतही कधीतरी बोलू असेही ते म्हणाले. आमदारकीचे अनेक महिने शिल्लक असताना आपल्याला राजीनामा द्यावा लागत आहे. कायद्यात अडकू नये म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला. त्यांनी तुतारी चिन्ह असलेल उपरणे खांद्यावर घेतले आणि तुतारी चिन्हाचा बोर्ड हातात झळकावला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रतिसाद दिला. मी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. नंतर कोविड आला. काही जणांनी मला विचारले तुम्ही गुवाहाटीला गेले का ? छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला. मी आमदार असो किंवा नसो अजित पवार राजकारणात राहिले पाहीजेत अशी भूमिका त्यांनी मांडली.

Published on: Mar 29, 2024 09:27 PM