काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर राज ठाकरे यांनी व्यक्त केलं मत, म्हणाले, ”हा परिणाम”
कर्नाटक निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या प्रचार यंत्रणेने पूर्ण जोर लावला मात्र त्यांना ते जमलं नाही आणि तेथे काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल मिळाला.
मुंबई : भाजपच्या देशभरात सुरू असलेल्या विजयी घोडदौडीला कर्नाटकातील जनतेने रोखले आहे. कर्नाटकात सलग दुसर्यांदा सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या प्रचार यंत्रणेने पूर्ण जोर लावला मात्र त्यांना ते जमलं नाही आणि तेथे काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल मिळाला. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले. नुकताच निकाल लागला. यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला दिसतोय. मात्र तुम्ही तुम्ही चॅनेलवाल्यांनी आणि त्यांच्या मालकांनी भारत जोडो यात्रेला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम लोकांमध्ये दिसतो असेही राज ठाकरे म्हणाले. तर कर्नाटकमध्ये स्वभावाचा, वागणुकीचा आणि आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचारांचा पराभव झाला आहे. तर याच्या आधी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत पत्रकार परिषदेत सावरकरांवर टीका केली होती. त्यावरून राज ठाकरे यांनी राहुल गांधींना इडियट म्हटलं होतं. पण आत तेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम हा कर्नाटक निवडणुकीत दिसत असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे असेच परिणाम हे महाराष्ट्रात दिसतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे.