धारावीतील तणावाला जबाबदार कोण? गंभीर आरोप करत किरीट सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड जबाबदार असल्याचे म्हणत धारावीतील मशिदीच्या नावाने एक खोटं पत्र व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर हे पत्र व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.
मुंबईतील धारावी येथे अनधिकृत मशिदीचा भाग पाडण्यासाठी महापालिकेचं पथक मुंबईतील धारावीत पोहोचलं यानंतर तेथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जमावाने महापालिकेची गाडी फोडली आणि मुस्लिमांचा मोठा समुदाय सुभानी मशिदीच्या परिसरात पोहोचला यावेळी काही नागरिकांनी रस्त्यातच ठिय्या मांडला. या प्रकारानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर भाष्य केले आहे. ‘उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांचं हे कटकारस्थान आहे. मुस्लीम नेत्यांना हाताशी घेऊन बोगस, बेनामी आणि उकसवणारं पत्र सगळीकडे व्हायरल केलं. मस्जिदीच्या नावाने बनावट लेटर जास्तीत जास्त लोकांना जमवण्यासाठी व्हायरल करण्यात आलं होतं. ज्यांनी हे लेटर व्हायरल केलं त्यांच्यावर कारवाई करा’, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. तर धारावीतील या मशिदीचे बांधकाम गैर असल्याचे वर्षा गायकवाड यांना माहिती होतं. ‘मस्जिद तोडने के लिये मोदी के लोग आ रहे है’ असे सांगून लोकांना भडकवण्यात आलं. धरावीत जमाव जमवण्यामागे नेमकं कोण हे पोलिसांनी शोधावं. मस्जिदीच्या ट्रस्टीविरोधात गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसात जाणार असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.