‘चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले’; इर्शाळवाडीच्या भेटीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना
त्याचदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली आणि दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वनही केले. त्यावरून ठाकरेंवर आता भाजपकडून टीका होताना दिसत आहे.
मुंबई | 23 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने मृतांचा आकडा 24 वर पोहोचला. त्याचदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली आणि दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वनही केले. त्यावरून ठाकरेंवर आता भाजपकडून टीका होताना दिसत आहे. त्यावेळी मी छोटा माणूस आहे. केंद्रातील सरकार मोठं आहे. त्यांना मणिपूर घटनेतून वेळ मिळाला तर मी बोलेन असा टोला भाजपला त्यांनी लगावला होता. त्यावरून आता भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी, तुम्ही मुख्यमंत्री असताना काय मदत केली, याचे उत्तर द्या असा सवाल केला. तर फक्त ते फोटोसेशन करण्यासाठी दुर्घटनाग्रस्त भागात जात असतील. त्याचा काही उपयोग नाही. चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले असा नीतेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, मणिपूर घटनेत कारवाई सुरु झाली झाली असून अरोपींना कठोर शिक्षा मिळणार असेही ते म्हणाले. त्याचवेळी जे मणिपूर आज बोलत आहेत ते जोधपूर घटनेवर बोलतील का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्यासाठीच हे असं बोलत असल्याचेही नीतेश राणे यांनी म्हटलं आहे.